‘या’ फळाच्या सेवनाने होतात आश्चर्यकारक फायदे , जाणून घ्या कोणते आहे ते फळ ..

कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे.
कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो. त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात.
औषधी गुणधर्म – कवठामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात.
उपयोग – कवठ हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते.अरुची, मळमळ, उलटी या विकारांवर कवठ सेवनाने रुची निर्माण होऊन ही लक्षणे कमी होतात.
कवठ हे स्तंभनकार्य करीत असल्यामुळे जुलाब होत असतील तर कवठ सेवनाने जुलाब कमी होतात. अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो.
लहान मुलांना कृत्रिमरीत्या बनवलेल्या जॅमऐवजी कवठाच्या गरात गूळ घालून मिक्सरमधून बारीक करून तयार झालेला जॅम पोळीला आतून लावून रोल करून खाण्यास द्यावे. यामुळे शरीरातील रक्ताचे व कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.कवठाची पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवावी किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवावी.
कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर व ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने ती आरोग्यसाठी लाभदायक असतात. कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.
सावधानता – कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Themaharashtrian.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.