तब्बल ४० वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीचं मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

तब्बल ४० वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीचं मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

कलाकार कायम त्याच्यातील अभिनयाची भूक भागविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्याची कला सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे बरेचसे कलाकार हे चित्रपट, वेब सीरिज, नाटक, मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यामध्येच अनेक कलाकार भाषेचं बंधन मोडून अन्य स्थानिक भाषेतील चित्रपटांमध्ये काम करु लागले आहेत. यात अनेक मराठी कलाकारांनीही बॉलिवूडची वाट धरली आहे. मात्र बऱ्याचदा बॉलिवूडची वाट धरलेले कलाकार पुन्हा मराठीकडे फारसे वळल्याचं दिसून येत नाही. मात्र एक अशी अभिनेत्री आहे जी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे वळली आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित मीडियम स्पाइसी या चित्रपटाच्या माध्यमातून ही अभिनेत्री मराठी कलाविश्वात पुनरागमन करत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग यांनी ४० वर्षांपूर्वी २२ जून १८९७ या मराठी चित्रपटाद्वारे कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्या मीडिमय स्पाइसीमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. “४० वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगलोरला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे असं मला मोहितने सांगितलं,”असं अरुंधती यांनी सांगितलं.

‘लक्ष्मी टिपणीस’या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दीमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एण्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती यांना ही भूमिका ऑफर केली,” असे दिग्दर्शकांनी सांगितलं. पुढे ते म्हणतात,“मी अरूंधती नाग यांना गेली १५-२० वर्ष ओळखतो. त्या जेवढ्या बहुआयामी आणि प्रतिभावान कलाकार आहेत, तेवढ्याच नम्रही आहेत. आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत ४० वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभुत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.”

‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा चित्रपट ५ जून २०२०ला प्रदर्शित होणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *