मोठा दिलासा! आता ‘एवढ्या’ रुपयात मिळणार कोरोनाची लस; सीरम इंस्टिट्यूटने जाहीर केली किंमत

लवकरात लवकर कोरोना लस तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक पाऊल उचललं आहे.
सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे.
GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली आहे.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे.
यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे. या लशींचं ट्रायल यशस्वी झालं, त्याला परवानगी मिळाली. तर सीरम इन्स्टिट्युटला या लशीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे.
कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा.
शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये”, असा सल्ला पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी याआधी सांगितलं होतं
तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाची लस येईल मात्र कदाचित या लशीची गरजही पडणार नाही, असा दावा केला होता.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, “सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे”