कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो का?

कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो का?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील समाजकारण,राजकारण ,व्यापार इत्यादी सर्वच क्षेत्रांना प्रचंड मोठ्या प्रमाणात धसका घ्यायला लावणारा एक शब्द मोठ्या वेगाने पसरत आहे तो म्हणजे कोरोना व्हायरस होय. साधारण जानेवारी महिन्यामध्ये कोरोना व्हायरस सर्वात प्रथम चीन या देशांमध्ये आढळून आला व त्यानंतर आता संपूर्ण जगभरामध्ये या व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे .मानवाने निसर्ग नियमाच्या विरोधात जाऊन जीवसृष्टीच्या नियमांना जो धक्का लावला आहे त्याचे परिणाम आता अशा वायरस द्वारे मानवाला भोगावे लागत आहे असे सर्वच वर्तुळात बोलले जात आहे मात्र या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जनमानस ढवळून निघाले आहे कारण या व्हायरस वर अजूनही म्हणावे तितक्या झपाट्याने पूर्णपणे बरे होण्याचे उपाय उपलब्ध आहे की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही आणि पूर्णपणे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा समाधानकारक नाही .मोठे सेलिब्रिटी ,राजकारणी, खेळाडू यांच्यासोबत सामान्य माणूस सुद्धा विमान प्रवासाची किंवा अन्यत्र गर्दीच्या ठिकाणी जाण्याची वेळ आली तर ते चुकवत आहे .रस्तेच्या रस्ते व्हायरसच्या भीतीमुळे अक्षरशः ओस पडले आहे .कोरोनाच्या भीतीचे सावट हे इतके गडद होत चालले आहे तेव्हा एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की कोरोना व्हायरसमुळे मृत्यू हा अटळ आहे का? या प्रश्नाचे उत्तर आज आपण काही तथ्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

संपूर्ण जगभरामध्ये जवळपास तीन हजार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी भारतामध्ये 29 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. मात्र भारतातील आरोग्य क्षेत्रातील उच्च स्तरावरील शोधांमुळे भारताने कोरोना व्हायरस पासून बरे होण्यासाठीचे उपाय शोधले आहेत व या उपायांनी तीन रुग्ण यशस्वीपणे बरे सुद्धा झाले आहेत. हे तीनही रुग्ण केरळ येथील रहिवासी आहेत .त्यामुळे केवळ अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनामुळे अंत हा मृत्यूच असणार आहे ही भीती मनातून काढून टाकणे सर्वप्रथम आवश्यक आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो .मात्र 60 वर्षापेक्षा जास्त आणि सात वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक जास्त असतो आणि या वयोगटा मध्ये सुद्धा लहान मुलांपेक्षा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरस होण्याचे प्रमाण जास्त असते.डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर, किडनीशी निगडीत समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसमुळे काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू अटळ आहे ही भीती दूर करणे आवश्यक आहे व यासाठी कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये म्हणून काही खबरदारीचे उपाय आपण पाळणे आवश्यक आहे .कोरोना व्हायरस हा मुख्यत्वे हवेमार्फत संसर्ग होणारा आजार आहे त्यामुळे कोणी शिंकतअसेल किंवा खोकत असेल तर आपल्या चेहऱ्या समोर हात धरणे आवश्यक आहे किंवा योग्य त्या दर्जाचा मास्क वापरणे नेहमीच फायद्याचे ठरेल. कोणालाही हस्तांदोलन करण्याऐवजी दोन्ही हात जोडून अभिवादन केल्यामुळे हाता द्वारे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका टळू शकतो.सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. सार्वजनिक ठिकाणचे लिफ्ट ,जिने ,दरवाजे इत्यादींद्वारे सुद्धा कोरोना व्हायरस होऊ शकतो म्हणूनच या वस्तूंना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणे म्हणजे सर्दी ,ताप, खोकला, घसा खवखवणे हीच असतात .अशी लक्षणे दिसू लागताच डॉक्टरचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक ठरते. उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे व भरपूर पाणी पिणे सुद्धा कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *